पुणे: कात्रज–कोंढवा रोडवरील गोकुळनगर परिसरातील (Pune Crime) घरफोडीचा गुन्हा उघड करत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून सुमारे 16 लाख 65 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीत दिसल्यानंतर फिर्यादीनेच “हा तर माझ्या ओळखीचा आहे” असे सांगितल्याने तपासाला निर्णायक वळण मिळाले. (Latest Marathi News)

जिजाप्पा आजिनाथ देवकाते (वय 65) यांनी येवलेवाडी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. 2 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून प्रवेश केला. बेडरूममधील कपाट फोडून सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 24 लाख 48 हजार 750 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. चोरी नेमकी कधी झाली हे सुरुवातीला स्पष्ट नव्हते.
तपासासाठी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून तीन संशयित निष्पन्न झाले. फुटेज फिर्यादीला दाखविल्यानंतर त्यातील एक जण ओळखीचा असल्याचे समोर आले. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी कात्रज येथील पीएमपी बस डेपो परिसरातून कुमार रामचंद्र ठाकर (वय 38, रा. दत्तनगर, आंबेगाव) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 115 ग्रॅम सोन्याचे दागिने, 800 मिलीग्रॅम चांदीचे दागिने आणि 35 हजार रुपये रोख असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने शेअर मार्केटमधील तोटा आणि कर्जबाजारीपणामुळे गुन्हा केल्याची कबुली दिली. फिर्यादींच्या घरात मौल्यवान वस्तू असल्याची माहिती त्याला आधीपासून असल्याचेही तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात त्याचे दोन साथीदार सहभागी असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला असून घरफोडीच्या घटनांमध्ये ओळखीचे व्यक्तीही सामील असू शकतात, याची जाणीव पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.







