Pune Crime: पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune) आता चक्क चंदनाचे चोरटे सक्रिय झाले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्या लॉ कॉलेज रोडवरील कार्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे चोरीला गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अशा प्रकारे चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी पहाटे सुमारे 3.30 च्या सुमारास झाली. असीम सरोदे यांच्या लॉ ऑफिसच्या आवारात असलेली मौल्यवान चंदनाची झाडे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने तोडून नेली. ही चोरी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पहाटेच्या शांत वेळेचा फायदा घेत चोरट्यांनी ही कारवाई केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर असीम सरोदे यांनी पुणे पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे. पुणे शहरात चंदन चोरी करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत चंदनाच्या झाडांची चोरी होण्याच्या घटना वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहाटेच्या वेळी कमी वर्दळ असल्याचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, शहरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






