पुणे: पुण्यातील येरवडा परिसरात (Pune Crime) चार वर्षांचे प्रेमसंबंध संपल्याचा राग मनात धरून एका तरुणाने थेट तरुणीचे लग्न मोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचे लग्न ठरल्याची माहिती मिळताच आरोपी प्रियकराने तिच्याशी असलेले खासगी फोटो भावी पती आणि त्यांच्या कुटुंबीयांना दाखवून विवाह मोडून पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि डिजिटल गैरवापराच्या गंभीर परिणामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या प्रकरणात इम्रान रहिमान शेख, वय 22, रा. लक्ष्मीनगर, येरवडा याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 21 वर्षांच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 30 आणि 31 जानेवारी 2026 दरम्यान घडली.
पोलिस तपासानुसार, फिर्यादी तरुणी आणि इम्रान शेख यांचे मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाच्या निर्णयानुसार तरुणीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीशी ठरल्याने तिने इम्रानशी सर्व संबंध तोडले. यानंतर आरोपीने तिला सतत त्रास देण्यास सुरुवात केली. “माझ्याशी संपर्क ठेवू नको, माझं लग्न ठरलं आहे,” असे स्पष्ट सांगूनही इम्रानने तिचा पाठलाग सुरूच ठेवला.
आरोपीनं चार वर्षांच्या नात्याचा गैरफायदा घेत तरुणीशी अश्लील भाषेत बोलणे सुरू केले आणि “तुझं लग्न होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीच्या आईला लोखंडी हत्यार दाखवून “तुमच्या चौघांपैकी एकाचा खून करीन,” अशी गंभीर धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने थेट तरुणीच्या भावी पतीकडे जाऊन तिच्याशी असलेले खासगी फोटो दाखवले. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला आणि अखेर तरुणीचे लग्न मोडले.
या घटनेनंतर तरुणीने धैर्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत इम्रान शेख याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत.
या प्रकरणातून नातेसंबंध तुटल्यानंतरही होणारा मानसिक छळ, धमक्या आणि खासगी फोटोचा गैरवापर किती घातक ठरू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. महिलांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरून न जाता तात्काळ कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







