पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा वर मंगळवारी (Mumbai–Pune Expressway) संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली असून आडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर पलटी झाला. टँकर पलटताच त्यामधून प्रोपिलीन गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे.

ही घटना संध्याकाळी सुमारे 5:15 वाजण्याच्या सुमारास घडली. उताराच्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेला टँकर चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट बोगद्याच्या जवळ पलटी झाला. सुरुवातीला अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली, मात्र काही क्षणातच टँकरमधून गॅस लिक होत असल्याचे लक्षात येताच परिस्थिती गंभीर बनली.
अपघातग्रस्त टँकरमध्ये प्रोपिलीन गॅस भरलेला असून हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे कोणताही स्फोट किंवा आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. अपघातस्थळापासून काही अंतरावरच वाहने थांबवण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर सुरक्षित ठेवण्यासाठी गॅस लिकेजवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले असून टँकर बाजूला करण्याची प्रक्रिया अत्यंत खबरदारीने युद्धपातळीवर सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या अपघातामुळे संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. प्रोपिलीनसारख्या धोकादायक वायूची वाहतूक करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.







