अमित मुंडीक

पुणे: फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री भारतीय (Pune Crime) इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे शटर उचकटून सुमारे १,२५,००० रुपयांच्या इलेक्ट्रिकल पॉलीकॅब वायरची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
तपासादरम्यान वडारवाडी परिसरात संशयित राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पाच संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आदित्य संतोष बंडगर (वय २०), प्रेम भाऊराव बोदडे (वय २१) आणि पवन संजय चव्हाण (वय १९) यांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत चोरीस गेलेली पॉलीकॅब वायर तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोपेड मोटारसायकली असा एकूण २,२६,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त कृषिकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून तपास पथकाने उल्लेखनीय यश मिळवले आहे.







