अकोला: अकोला शहरात सोशल मीडियासाठी (Crime News) रील शूट करण्याच्या बहाण्याने 20 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार (Akola News) उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी तरुणीसह तिचा प्रियकर आणि आणखी दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. जुने शहर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली. (Vidarbh News)

फिर्यादी आणि आरोपी तरुणी या शेजारी राहत होत्या. दोघींमध्ये घनिष्ठ मैत्री असल्याने घरात ये-जा होती. सोशल मीडियावर रील शूट करण्यासाठी आरोपीने मैत्रिणीला घरी बोलावले. सुमारे दीड तास शूटिंग सुरू ठेवण्यात आले, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. या काळात कपडे बदलण्याचा बहाणा करत आरोपी मैत्रिणीच्या घरात गेली. घराची मांडणी आणि कपाटाची माहिती आधीपासून असल्याने तिने सुमारे 150 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 90 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.
चोरी केल्यानंतर संशय टाळण्यासाठी ती पुन्हा शूटिंगमध्ये सहभागी झाली. काही वेळाने दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. हालचालींच्या आधारे संशय आरोपीकडे वळला. चौकशीत तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







