पुणे : शहरातील सिंहगड रस्ता परिसर पुन्हा एकदा (Pune Crime) गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. माणिकबाग भागात शनिवारी सायंकाळी 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. भरवस्तीत, तेही वर्दळीच्या वेळेत झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान माणिकबाग परिसरातील बर्गर किंग दुकानासमोर संबंधित तरुण उभा होता. त्या वेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी काही कळण्याच्या आत धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला गंभीर जखमी केले.
घटना इतकी झपाट्याने घडली की आसपासच्या नागरिकांना काही समजण्याआधीच हल्लेखोरांनी मुलाला रक्ताच्या थारोळ्यात सोडले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. दोन दुचाकींवरून आलेल्या संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, गटबाजी किंवा इतर कोणत्या कारणातून हा हल्ला झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दिवसाढवळ्या, गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. शहरात अल्पवयीनांवरील वाढत्या गुन्ह्यांमुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.






