Pune Crime : पुणे : शहरात अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून कात्रज परिसरात एका विवाहित महिलेचा पतीने छळ केल्याची घटना समोर आली आहे. वास्तू सल्लागार आणि होलिस्टिक हिलर यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीसह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय महिलेचा विवाह 2016 मध्ये विवेक निकम याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र 2024 नंतर पतीची ओळख एका महिला वास्तू सल्लागाराशी झाली आणि त्यानंतर परिस्थिती बदलली. संबंधित महिलेने पत्नीबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून पतीच्या मनात संशय निर्माण केला. यानंतर पतीने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली.
मे 2025 मध्ये या प्रकरणात एका होलिस्टिक हिलर महिलेचा समावेश झाला. तिने पतीला पितृदोष असल्याचे सांगून विविध अघोरी उपाय करण्यास भाग पाडले. पत्नीवर करणी झाली असल्याचे सांगून तिच्याबद्दल चुकीची माहिती दिली. ऑगस्ट 2025 मध्ये पत्नीला डेक्कन परिसरातील नदीकाठी नेऊन काही धार्मिक कृती करण्यास भाग पाडले. घरात तांब्याची तार आणि दगड ठेवण्यासारखे उपायही सुचवण्यात आले.
या काळात पतीने पत्नीला मुलगा होण्यासाठी मंत्रोपचार करण्यास सांगितले तसेच दुसरे लग्न करण्याबाबत दबाव टाकल्याचेही समोर आले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली नातेवाईकांकडून पैसे उकळल्याचाही आरोप आहे. याशिवाय पत्नीला माहेरून 5 लाख रुपये आणण्यास सांगून मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती आणि दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे समाजात अंधश्रद्धेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.







