Pune Accident : उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून, कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात इसमाचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव मूळ हद्दीतील इनामदार वस्ती परिसरातील अमर रोज नर्सरीसमोर रविवारी (ता. 15) सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी सचिन रामराव कडवळे (वय 47, व्यवसाय शेती, रा. कड वस्ती, कोरेगाव मूळ, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ गावाच्या हद्दीतील पुणे-सोलापूर महामार्गावर एक अनोळखी व्यक्ती पायी जात होती. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्या व्यक्तीस जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्या व्यक्तीस गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासी सचिन कडवळे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 106(1), 125(ब), 125(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134/177 नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सस्ते करत आहेत.







