Pune Accident : पुणे : देहू रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या किवळे परिसरात मुंबई-पुणे महामार्गावरील कात्रज-देहू रोड बायपासवर शुक्रवारी संध्याकाळी एक अपघात घडला. एका आलिशान मर्सिडीज कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात मर्सिडीज कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रक महामार्गाच्या कडेला उभा होता, त्याच वेळी भरधाव वेगात आलेल्या मर्सिडीज कारने त्याला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच देहू रोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज चालकाने अपघात आपल्याच चुकीमुळे झाल्याचे मान्य केले आहे. सध्या या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ट्रक चालकानेही आपल्या वाहनाचे विशेष नुकसान झाले नसल्याचे सांगितले असून त्यानेही तक्रार देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रकवर ‘निवडणूक साहित्य – तातडीचे’ असे लिहिलेले दिसत असल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, पोलिसांनी या ट्रकमधील साहित्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.






