पुणे: शहरातील कोथरुडचा गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) विदेशात पसार (Pune News) झाल्यानंतर त्याच्या पासपोर्टबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात चांगलाच गहजब माजला असून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी थेट भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धंगेकर यांनी कोथरुडमधील गुन्हेगारीला समीर पाटील जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांचा निलेश घायवळसोबतचा फोटोही दाखवला होता.

दरम्यान, या आरोपांवर प्रत्युत्तर देण्यासाठी कोथरुडमधील व्यावसायिक समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्ट केलं की, “निलेश घायवळसोबत माझा कोणता फोटो धंगेकरांनी दाखवला आहे, हे मला माहित नाही. त्याबाबत स्पष्टीकरण धंगेकरांनीच द्यावं. मी कधीही असं म्हटलं नाही की मला निलेश घायवळ माहित नाही. मी कोथरुडकर आहे, विविध कार्यक्रमांमुळे भेट झाली असेल, पण तो माझा मित्र नाही. फक्त ओळख आहे एवढंच.”

समीर पाटील यांनी धंगेकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हटलं की, “धंगेकरांनी माझ्यावर दोन आरोप केले आहेत. पहिला म्हणजे मी दादाच्या ऑफिसमध्ये कामाला आहे, आणि दुसरा म्हणजे मी मकोकाचा आरोपी आहे. मात्र मी 2000 सालापासून पुण्यात राहतो, निवडणुकांमध्ये चंद्रकांत पाटील यांचं काम केलं आहे. कोथरुडमध्ये मला सगळेजण ओळखतात. जर माझ्याविरोधात काही पुरावे असतील तर धंगेकरांनी ते दाखवावेत. केवळ आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
धंगेकरांनी केलेल्या आरोपांनुसार, “समीर पाटील हा मोक्यातील गुन्ह्याचा आरोपी असून पोलिसांवर दादागिरी करत आहे. पोलिससुद्धा याबाबत बोलतात. मग चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या ताटाखाली काय चाललं आहे ते का दिसत नाही? समीर पाटीलचा बंदोबस्त केला पाहिजे. गृहमंत्र्यांनी याबाबत पावलं उचलावीत.” असे ते म्हणाले होते. तसेच त्यांनी निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र लिहिल्याचंही सांगितलं.
या संपूर्ण घडामोडींमुळे कोथरुड परिसरातील निलेश घायवळ प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. आता पुढील काळात या वादाला कोणता कल मिळतो आणि पोलिस याप्रकरणी काय पावलं उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







