आळंदी : रायगडमधील दिवेआगार समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांवर काळाचा घाला घातला. विनर्स अॅकॅडमीच्या ११वी आणि १२वी विज्ञान शाखेच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर आळंदी पोलीस ठाण्यात घडलेला प्रसंग मन हेलावून टाकणारा आहे. आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली, त्यावेळी मृतांपैकी एका विद्यार्थ्याचे वडील पोलीस ठाण्यातच उपस्थित होते. मृतांच्या यादीत आपल्या मुलाचे नाव असल्याचे समोर येताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

गुरुवारी (१ ऑक्टोबर) आळंदी पोलीस ठाण्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला केळगावचे पोलीस पाटील युवराज वहिले हेही उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच पोलीस निरीक्षक भीमा नरके यांना नगराध्यक्ष प्रशांत कऱ्हाडे यांचा फोन आला. दिवेआगार येथे आळंदीतील आठ विद्यार्थी समुद्रात बुडाल्याची माहिती देत त्यांनी पोलिसांना तातडीने नगर परिषदेत येण्यास सांगितले.
ही माहिती मिळताच बैठक रद्द करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकताच युवराज वहिले यांना धक्का बसला. त्यांचा मुलगा राजवीरही याच सहलीसाठी गेला होता. त्यांनी उपस्थित पोलिसांना आपला मुलगा देखील सहलीला गेल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण अधिकच गंभीर झाले.

दरम्यान, व्हॉट्सअॅपवर दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असलेली यादी आली. या यादीत राजवीर वहिले याचेही नाव असल्याचे समोर आले. आपल्या मुलाचे नाव मृतांच्या यादीत पाहताच युवराज वहिले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वेळापूर्वीपर्यंत सहलीला गेलेला मुलगा सुखरूप परत येईल, अशी अपेक्षा असताना त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले.

या घटनेने आळंदी पोलीस ठाण्यात उपस्थित अधिकारी आणि नागरिकही भावूक झाले. आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूने आळंदी परिसरावर शोककळा पसरली असून, दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.







