पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Local Bodies Election) तयार करण्यात आलेल्या प्रारूप (Pune Election) मतदारयादीतील (Pune Voting List) त्रुटींबाबत नागरिकांकडून हरकती दाखल होण्याची प्रतीक्षा न करता महापालिकेने स्वत:हून आवश्यक दुरुस्ती करावी, असा स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिला आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकणी यांनी हा आदेश जारी केला. आहे.

महापालिकेने प्रारूप मतदारयादी जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हरकती आणि तक्रारी समोर येत आहेत. प्रभागांचे विभाजन आणि नावे जोडताना झालेल्या चुकांमुळे अनेक मतदारांचे नाव चुकीच्या प्रभागात किंवा चुकीच्या विधानसभा-लोकसभा मतदारसंघात नोंदवले गेल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, संबंधित तक्रारींची नोंद होण्याची वाट न पाहता महापालिका आयुक्तांनी स्वत:हून चुकीची माहिती तपासून योग्य त्या दुरुस्त्या कराव्यात. तसेच दुरुस्ती करताना फक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर विसंबून न राहता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
आयोगाने स्पष्ट केले की विधानसभा मतदार यादीचे अचूक प्रभागनिहाय विभाजन करणे ही प्रत्येक महापालिका आयुक्तांची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रारूप यादीत चुका आढळल्यास अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्यापूर्वी त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.
दरम्यान, महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदारयादीत मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे समोर आले आहे. मुंढवा येथील मतदारांची नावे वारजे प्रभागात, तर खेड शिवापूर येथील मतदारांची नावे सिंहगड रस्त्यावरील सन सिटी परिसरातील यादीत आढळल्याचे उदाहरण नागरिकांनी दिले. प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता कार्यालयात बसून यादी तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, “प्रारूप मतदारयादीतील चुका आणि तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे पोहोचल्या असून, अशा प्रकारचे प्रकरण राज्यातील अनेक महापालिकांमध्ये घडले आहे. आयोगाने संबंधित मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”







