पुणे: पुण्यात डॉक्टरांना धमकावून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘तुम्ही आणि तुमची पत्नी अल्पवयीन मुलींचे गर्भपात करता. तुमच्या क्लिनिकचे नाव वर्तमानपत्रात छापून दवाखाना बंद करू,’ अशी धमकी देत दोघांनी डॉक्टरांकडे खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रणव ऊर्फ प्रसाद बोरसे (वय २५) आणि शुभम सौदागर (वय २६, दोघे रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विमाननगर परिसरातील एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास टिंगरेनगर येथील हॉटेल ऑरम बँक्वेटमध्ये हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डॉक्टर गेल्या तीन दशकांपासून वैद्यकीय व्यवसाय करत असून त्यांचे विश्रांतवाडी येथे क्लिनिक आहे. ४ ऑगस्ट रोजी ते टिंगरेनगरमधील हॉटेल ऑरम बँक्वेट येथे गेले होते. त्यावेळी आरोपी दोघांनी त्यांची भेट घेतली.

आरोपींनी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीविषयी अल्पवयीन मुलींचे गर्भपात करत असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला. तसेच आपण पत्रकार असल्याचे सांगून डॉक्टरांचे नाव वर्तमानपत्रात छापून त्यांचा दवाखाना बंद करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
‘तुम्हाला पाच वर्षांची शिक्षा होईल, जामीन मिळण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील आणि तुमच्या पदव्या जातील,’ अशी भीती दाखवत प्रकरणातून वाचायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपींनी केल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता अटक होईल, अशी धमकीही देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
डॉक्टरांनी त्यावेळी आरोपींच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या तक्रारीच्या आधारे आता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील उगले करीत आहेत.






