पुणे: पुण्यातील हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक (Pune Crime) आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. महंमदवाडी रस्त्यावरील रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेतून तब्बल १३ बांगलादेशी तरुणींनी नियोजनबद्ध पद्धतीने पलायन केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेदरम्यान केअरटेकर आणि सुरक्षारक्षकावर हल्ला करण्यात आल्यामुळे महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार अत्यंत शिताफीने घडवून आणण्यात आला. एका तरुणीने औषध घेण्याच्या बहाण्याने केअरटेकर लक्ष्मी कांबळे यांना दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या इतर मुलींनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या हात-पाय बांधून तोंडात बोळा कोंबून त्यांना वैद्यकीय कक्षात कोंडून ठेवण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दृश्ये अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संस्थेच्या आवारात साफसफाई सुरू असल्याने मुख्य दरवाजा उघडा राहिला होता. याचाच फायदा घेत या १३ मुलींनी सुरक्षारक्षकाला बाजूला सारत, त्याचा चावा घेत तिथून पलायन केले.
घटनेनंतर काळेपडळ पोलीस ठाणे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून सय्यदनगर परिसरातून दोन मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, उर्वरित ११ मुली अद्याप फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे इतकी मोठी घटना घडूनही अद्याप अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी केवळ ‘जनरल डायरी’मध्ये नोंद केली असून यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
सदर संस्था मानवी तस्करीतून सुटका झालेल्या महिलांसाठी कार्य करते. संस्थेच्या माहितीनुसार, १६ मार्च २०२४ पासून त्यांना मिळणारे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते. वारंवार मागणी करूनही संरक्षण पुन्हा देण्यात आले नाही, असा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.
या मुली बांगलादेशी नागरिक असून त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया १ ते २ वर्षे चालते. या विलंबामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण होत असल्याचेही संस्थेने स्पष्ट केले आहे.
सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित मुलींचा शोध घेतला जात असून या घटनेमुळे पुण्यातील महिला संरक्षण गृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.







