पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण, अपूर्ण विकासकामे आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर हा केवळ अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सिल्वर ओक सोसायटीसमोर दुचाकी आणि कंटेनरची धडक झाली. या दुर्घटनेत प्रतिभा ज्ञानेश्वर नाईक या 16 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर तिची जुळी बहीण वैष्णवी ज्ञानेश्वर नाईक गंभीर जखमी झाली आहे. वैष्णवीच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही बहिणी राजेश सोसायटी येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, वडील ज्ञानेश्वर नाईक हे दोन्ही मुलींना दुचाकीवरून शाळेत घेऊन जात असताना हा अपघात झाला.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, कामाची गती अत्यंत संथ असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ अपघाताची नोंद करून न थांबता रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. भूसंपादनाच्या अडचणींचे कारण न देता महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.






