पुणे: श्री क्षेत्र आळंदीमध्ये रविवारी आयोजित भव्य मिरवणुकीच्या (Pune Traffic Diversion) पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. सकल हिंदू समाज आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागामुळे मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 3 ते रात्री 9 या कालावधीत हे निर्बंध लागू असतील. (Latest Marathi News)

आळंदी आणि मोशी परिसर हा आधीच वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. विशेषतः सण-उत्सवांच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्त्यांवर ताण वाढतो. याच पार्श्वभूमीवर जड वाहनांना प्रवेशबंदी घालून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
चाकणकडून आळंदीकडे येणाऱ्या जड वाहनांना थेट प्रवेश दिला जाणार नाही. या वाहनांना मोशीतील भारतमाता चौक, देहूफाटा, जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम आणि भोसरी-मॅगझीन चौक मार्गे वळवण्यात येणार आहे. तसेच आळंदीहून चाकणकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही इंद्रायणी हॉस्पिटल चौक मार्गे जाण्यास बंदी असेल. त्याऐवजी बोपदेव चौक, चिंबळी फाटा आणि पुणे-नाशिक महामार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय जोग धर्मशाळा, चाळीस फुटी चौक, वडगाव रस्ता आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरूनही जड वाहने वळवण्यात येणार आहेत. या बदलांमुळे स्थानिक वाहतूक आणि मिरवणुकीचा मार्ग मोकळा ठेवण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.






