पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (Ganesh Bidkar) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. तब्बल 119 जागांवर विजय मिळवत (Pune Politics) भाजपने एकहाती सत्ता प्रस्थापित केली असून, या निकालाने पुण्यातील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने गणेश बिडकर यांची महापालिकेतील गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. येत्या 3 तारखेला महापौरपदाचा निर्णय जाहीर होणार असून, पुण्याचा पुढील महापौर कोण (Pune Mayor) असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

गेल्या चार वर्षांपासून पुणे महानगरपालिका प्रशासकांच्या ताब्यात होती. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधींच्या माध्यमातून पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार सुरू होत असताना सत्ताधारी भाजपवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. पुणेकरांनी भाजपवर विश्वास टाकत 119 नगरसेवक निवडून दिले असून, या विश्वासाला कामातून उत्तर देण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी अनेक विकासात्मक आश्वासने दिली होती. चांगल्या दर्जाचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न, अंतर्गत आणि जोडरस्त्यांचे जाळे मजबूत करणे तसेच पीएमपीएल सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, हे मुद्दे पुढील काळात प्राधान्याने हाताळले जाण्याची अपेक्षा आहे.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर बोलताना गणेश बिडकर यांनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. यापूर्वीही दोन वेळा गटनेतेपदाची जबाबदारी सांभाळल्याचा अनुभव उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वेगळ्या पक्षात असतानाही खंबीर नेते अजित पवार यांनी नेहमीच विकासकामांसाठी मार्गदर्शन केले, ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली.
या निवडणुकीत भाजपच्या विजयाइतकीच विरोधकांची पिछेहाट चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 30 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसने आपली ताकद वाढवत 15 जागा जिंकल्या. इतर पक्षांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. विशेष म्हणजे भाजपच्या विजयी नगरसेवकांपैकी सुमारे 80 नगरसेवक प्रथमच महापालिकेत निवडून आले आहेत. अनुभव आणि नव्या ऊर्जेचा समन्वय साधत शहराचा विकास साधण्याचे मोठे आव्हान आता नव्या नेतृत्वासमोर उभे आहे.







