सोमाटणे(पुणे): महाशिवरात्री निमित्त घोरावडेश्वराच्या डोंगरावर असलेल्या घोरावडेश्वराच्या दर्शनासाठी पीएमपीएमएलच्या वतीने निगडी (पवळे चौक) ते घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्या पर्यंत सुमारे २४ बसेस जास्त सोडण्यात येणार आहेत.

दरवर्षी या ठिकाणी संपूर्ण जिल्हा भरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या बसेस सोडण्यात येणार आहेत. बुधवार ( ता. २६) रोजी महाशिवरात्र निमित्त घोरावडेश्वराची यात्रा असते, यानिमित्त पाहते ३ वाजल्यापासून डोंगरावर येणाऱ्या भक्तांची वर्दळ सुरु होते. ही वर्दळ रात्री २ ते ३ वाजेपर्यंत असते. या जड बसगाड्या साधारण पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने एक अशा असणार आहेत.
पवळे चौक येथून पहाटे ५:३० वाजता पहिली बस सोडण्यात येणार आहे. घोरावडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी पीएमपीएमएल च्या वतीने नियमित आणि अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त केला.
दरवर्षी महाशिवरात्र निमित्त डोंगराच्या पायथ्याशी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सध्या हा साप्ताह सुरु असल्यानेही गर्दी वाढणार आहे. याचा अंदाज घेवून प्रशासनाने जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याणे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.







