Bullet Train: मुंबई: मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. अशातच केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणखी एक महत्त्वाची भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई–पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली असून या निर्णयामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सुमारे 170 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर सध्या रस्ता किंवा पारंपरिक रेल्वेमार्गे प्रवास करण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. हायस्पीड रेल्वेमुळे हा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे राज्याची आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्रे आहेत. या दोन शहरांमधील जलद संपर्कामुळे उद्योग, आयटी, शिक्षण, पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला फायदा होईल. प्रवास सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक होणार असल्याने प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार आहे.
या प्रकल्पात मुंबई–पुणे–हैदराबाद असा एकूण सुमारे 767 किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या हायस्पीड रेल्वेचा वेग ताशी 220 ते 350 किलोमीटर इतका असू शकतो. या संपूर्ण मार्गावर एकूण 11 स्थानके प्रस्तावित आहेत. पुणे ते हैदराबाद दरम्यान सुमारे 550 किलोमीटरचे अंतर ही रेल्वे अवघ्या 1 तास 55 मिनिटांत पार करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांमधील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक मजबूत होतील.
दरम्यान, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी 2.77 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष 2026–27 साठी रेल्वे मंत्रालयाला 2,77,830 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सध्या अहमदाबाद–मुंबई हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून त्यानंतर मुंबई–पुणे–हैदराबाद हा देशातील महत्त्वाच्या हायस्पीड रेल्वे मार्गांपैकी एक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे भारताच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे.





