Pune Crime : पुणे : पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वाघोली परिसरात घडलेल्या एका घटनेने नागरिकांची चिंता वाढवली आहे. घराबाहेर पडताना अनेक जण सोयीसाठी घराची चावी कुंडीत, चप्पल स्टँडमध्ये किंवा पायपुसण्याखाली ठेवतात. मात्र, ही सवय किती धोकादायक ठरू शकते याचा प्रत्यय वाघोलीतील जे. जे. नगर परिसरात आला आहे. येथे चोरट्यांनी चप्पल स्टँडमध्ये ठेवलेल्या चावीचा वापर करून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.

या प्रकरणात रेवण अंगडी हे सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबासह कामानिमित्त घराबाहेर पडले होते. घाईत त्यांनी घराची चावी घराबाहेर असलेल्या चप्पल स्टँडमध्ये ठेवली. घर रिकामे असल्याची खात्री झाल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी ही चावी शोधून काढली. कोणतीही तोडफोड न करता त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि थेट घरात प्रवेश केला.
घरात शिरल्यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाची पाहणी केली. कपाटातील लॉकर तोडून त्यामधील सोन्याचे दागिने त्यांनी लंपास केले. संध्याकाळी कुटुंबीय घरी परतल्यावर बेडरूममध्ये सोन्याची एक वस्तू जमिनीवर पडलेली दिसली. त्यामुळे संशय बळावल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता लॉकर फोडल्याचे आणि दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
विशेष म्हणजे घराचा दरवाजा सुरक्षित असल्याने आणि कुठेही उचकटण्याचे किंवा तोडण्याचे चिन्ह नसल्याने सुरुवातीला चोरी झाल्याचा अंदाजच आला नाही. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.
या घटनेनंतर नागरिकांनी घराची चावी बाहेर लपवून ठेवण्याची सवय टाळावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना योग्य खबरदारी घेणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.






