पुणे: मोबाईल विम्याच्या अटींचा आधार घेत ग्राहकाचा दावा फेटाळणाऱ्या विमा कंपनीला पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. “विम्याचा लाभ एकदाच घेता येतो” हा कंपनीचा युक्तिवाद फेटाळून आयोगाने संबंधित ग्राहकाला नवीन आयफोन द्यावा किंवा 89,000 रुपये 4 टक्के व्याजासह परत करावेत, असा आदेश दिला आहे. तसेच मानसिक त्रास आणि तक्रार खर्चापोटी अतिरिक्त 13,000 रुपये देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

धायरी येथील एका महिलेने कोथरूडमधून 89,000 रुपये किंमतीचा ‘आयफोन एक्स’ खरेदी केला होता. फोनच्या संरक्षणासाठी त्यांनी 15,000 रुपये भरून विमा पॉलिसी घेतली. काही दिवसांतच फोन खाली पडून कॅमेऱ्याचे नुकसान झाले. पहिल्या दाव्यानंतर विमा कंपनीने फोन बदलून दिला. मात्र दुसऱ्यांदा फोन बिघडल्यावर कंपनीने “विम्याचा लाभ फक्त एकदाच मिळतो” असे सांगत दावा नाकारला.
याविरोधात महिलेने सप्टेंबर 2018 मध्ये पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे तक्रार दाखल केली. ग्राहकाच्या वतीने अॅड. श्रीराम करंदीकर यांनी बाजू मांडली. आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी दिलेल्या निरीक्षणात स्पष्ट केले की, पॉलिसीत एकदाच लाभ लागू होतो अशी स्पष्ट लेखी अट नव्हती. केवळ एकदा दुरुस्ती किंवा बदल करून पॉलिसी संपली असे गृहित धरता येत नाही.
2018 पासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढ्याला तब्बल 7 वर्षांनंतर यश मिळाले. या निर्णयामुळे विमा कंपन्यांनी अटी-शर्तींचा मनमानी अर्थ लावू नये, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. ग्राहकांनी विमा पॉलिसी घेताना अटी नीट वाचाव्यात, तर कंपन्यांनीही पारदर्शकता राखावी, असे या निकालातून अधोरेखित झाले आहे.







