Ashok Kharat case : न्हावरे : नाशिकमध्ये स्वतःला चमत्कारिक शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात या भोंदू बाबाच्या करामतींचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खरातविरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. त्यामध्ये थेट अशोक खरातविरुद्ध 8 आणि त्याच्याशी संबंधित 2 गुन्ह्यांचा समावेश आहे.

या नव्या प्रकरणात शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती व व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी फिर्याद दिली आहे. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक आणि खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, लॉजिस्टिक व्यवसायात यश मिळवण्यासाठी ‘अवतार पूजा’ करण्याचा सल्ला देत अशोक खरात याने राजेंद्र जासूद यांना जाळ्यात ओढले. पूजेपूर्वी ‘परिसाची शक्ती’ मिळवण्यासाठी 21 देशांची भ्रमंती करावी लागेल, अन्यथा नागदेवतेचा कोप होऊन मृत्यू होईल, अशी भीती दाखवण्यात आली.
या भीतीपोटी राजेंद्र जासूद यांनी 2018 ते डिसेंबर 2025 या कालावधीत वेळोवेळी मोठ्या रकमा खर्च केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी सुमारे 29 लाख 81 हजार रुपये खर्च करण्यासही त्यांना भाग पाडण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अवतार पूजेसाठी 2018 मध्ये MH-15-GL-8181 क्रमांकाची मर्सिडीज कार भेट दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तसेच युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश यांसह अनेक देशांच्या दौऱ्यांवर नेण्यात आले. यापूर्वी म्यानमार व ग्रीनलँड दौऱ्यांचाही समावेश आहे.
ग्रीनलँडमध्ये ‘हे स्वर्गाचे दुसरे टोक आहे’ असा दावा करत हॉटेलमध्ये फरशीवर झोपून धार्मिक विधीचा देखावा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
1 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री इशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस नेऊन ‘महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील’ असे सांगत बनावट नाग दाखवून भीती निर्माण करण्यात आली. त्यानंतर पुढील पाच वर्षांत 21 देशांची यात्रा करण्याचा सल्ला देत आणखी पैसे उकळल्याचा आरोप आहे.
मिरगाव येथील फार्महाऊस बांधकामासाठी 1 कोटी 11 लाख रुपये, तुर्कस्थानमधील लाकूड व लोखंडी फर्निचरसाठी 49 लाख रुपये, सागवानी फर्निचरसाठी 29 लाख रुपये आणि किचनसाठी 42 लाख 50 हजार रुपये अशा विविध कारणांखाली मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जासूद यांनी पैसे परत मागितले असता, अशोक खरात यानेच वावी पोलीस ठाण्यात राजेंद्र जासूद व दिनेश परब यांच्या विरोधात 5 कोटींची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंधश्रद्धा आणि भीतीचा गैरफायदा घेत अशोक खरात याने कोट्यवधींची फसवणूक केल्याचे या प्रकरणातून समोर येत असून, पोलिस तपासात आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.







