पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Ajit Pawar) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Mahapalika Nivadnuk) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप (Chandrashekhar Bawankule) यांच्यातील संघर्ष चांगलाच पेटला आहे. दोन्ही शहरांत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून थेट लढत भाजपासोबत होत आहे. त्यामुळे प्रचाराच्या रणांगणात आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होत चालली आहे. (Latest Marathi News)

याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उकरून काढत भाजप-शिवसेना युती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले की, 1999 पूर्वीच्या काळात सिंचन प्रकल्पांच्या खर्चात जाणीवपूर्वक वाढ करण्यात आली होती आणि त्यामागे ‘पार्टी फंड’साठी कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात होती.

अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, एका सिंचन प्रकल्पाची मूळ किंमत 200 कोटी रुपये होती. मात्र तत्कालीन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये पार्टी फंड म्हणून मागितले गेले. याशिवाय काही अधिकाऱ्यांनी त्यात आणखी 10 कोटींची भर घातली आणि 200 कोटींचा प्रकल्प थेट 310 कोटी रुपयांवर गेला. विशेष म्हणजे त्या काळात सिंचन खाते भाजपकडे होते, याकडे लक्ष वेधत अजित पवारांनी थेट भाजपला लक्ष्य केले आहे.

“महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे असताना मला अनेक प्रकल्पांच्या फाईली मिळाल्या. पुरंदर सिंचन योजना 330 कोटी रुपयांवर नेण्यात आली होती. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितले की यात मोठी गडबड आहे. 110 कोटी रुपयांची वाढ कशी झाली, याची चौकशी केली असता पार्टी फंडासाठी पैसे मागितल्याचे समोर आले. त्यामुळेच मी ती योजना रद्द केली. आजही त्या फाईली माझ्याकडे आहेत आणि गरज पडल्यास मी पुरावे दाखवेन,” असा खळबळजनक दावा अजित पवारांनी केला.
याआधीही अजित पवारांनी “ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, तेच आज माझ्यासोबत सत्तेत बसले आहेत,” असे म्हणत भाजपला टोला लगावला होता. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमधील संघर्ष उघडपणे समोर येत आहे.
दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “अजित पवार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी 1999 पासून आतापर्यंत गप्प का बसले? जर फाईली त्यांच्या हातात होत्या, तर तेव्हाच खुलासा का केला नाही? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नकारात्मक चित्र दिसत असल्यामुळेच ते अशी विधाने करत असावेत,” असा पलटवार बावनकुळे यांनी केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, आता सत्तेतील मित्रपक्षांमधील तणाव उघड करणारी ठरली आहे. सिंचन घोटाळ्याचे आरोप, जुन्या फाईली, पार्टी फंडाचे दावे आणि थेट आरोप-प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बनली आहे. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर आता केवळ नगरसेवक निवडत नाहीत, तर या सत्तासंघर्षावरही आपला कौल देणार आहेत.







