पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांच्या विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी (Ajit Pawar Death) नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो आणि DGCA यांच्या पथकांनी तपासाचा फोकस आता विमानाने लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नावर केंद्रित केला आहे. या नव्या धाग्यांमुळे अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Baramati News)

तपासात चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष

सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा प्रामुख्याने चार मुद्द्यांवर भर देत आहेत. पहिला मुद्दा म्हणजे दृश्यमानता. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळ परिसरात दाट धुके होते. दृश्यमानता केवळ 800 ते 3000 मीटर दरम्यान असतानाही वैमानिकाने लँडिंगचा निर्णय का घेतला, याचा तपास सुरू आहे. दुसरा मुद्दा म्हणजे लँडिंगसाठी स्पष्ट परवानगी देण्यात आली होती का, की सिस्टिममध्ये काही तांत्रिक गोंधळ निर्माण झाला होता. तिसरा मुद्दा म्हणजे अप्रोच आणि लँडिंगदरम्यान इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीत अचानक बिघाड झाला होता का, याची पडताळणी. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसऱ्या प्रयत्नात लँडिंग अँगल चुकला का, ज्यामुळे विमान धावपट्टीऐवजी बाजूला जाऊन कोसळले. हा अंतिम निर्णय वैमानिकाचा होता की एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तशी सूचना देण्यात आली होती, याचाही शोध घेतला जात आहे.

तपासात असे समोर आले आहे की, पहिल्या प्रयत्नात दृश्यमानता कमी असल्याने वैमानिकाने ‘गो-अराउंड’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी स्पष्ट न दिसत असतानाही लँडिंगचा धोका का पत्करण्यात आला, हा तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
दरम्यान, विमानाचा ब्लॅक बॉक्स सध्या दिल्लीतील प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आला असून, त्यातील डेटा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र CID नेही स्वतंत्र तपास सुरू केला आहे. या अनुषंगाने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली आहे. दौऱ्याचे नियोजन, विमानाची निवड आणि निर्णय प्रक्रिया याबाबतचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.







