पुणे : मद्याच्या नशेत भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या चालकाने सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) सरकारी वाहनाला धडक दिल्याची घटना बिबवेवाडीतील गंगाधाम रस्त्यावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतःच जखमी झाला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश प्रदीप नवलखा (वय ४४, रा. जितोनगर, काकडे वस्ती, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मोटार परिवहन विभागातील पोलीस कर्मचारी पोपट महिपती पाटील (वय ५४) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलखा हा मद्यप्राशन करून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालवत होता. गंगाधाम रस्त्यावरून जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीची सहायक पोलीस आयुक्तांच्या सरकारी वाहनाला धडक बसली. या अपघातात नवलखा स्वतः जखमी झाला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.








