पुणे : पुणे महानगरपालिकेत विविध पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील आरोपी डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. गिरम यांनी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. खेडेकर यांना यापूर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली होती.

पोलिसांच्या तपासानुसार, पुणे महानगरपालिकेतील विविध पदांवर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांकडून सुमारे एक कोटी ९५ लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर, महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि इतर आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, मे २०२२ ते मे २०२६ या कालावधीत हा कथित गैरव्यवहार झाला.

आरोपींनी संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून नियुक्तीपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.

तसेच उमेदवारांना बनावट ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही देण्यात आल्या होत्या. उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे भासवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलीस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती.
डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी ॲड. अमेय बलकवडे यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने आरोपी आणि फिर्यादीच्या भावामध्ये जुना मालमत्तेसंबंधी वाद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या प्रकरणातील सर्व पुरावे कागदोपत्री असून ते पोलिसांनी आधीच जप्त केले आहेत, असा युक्तिवाद करण्यात आला.
आरोपीकडून कोणतीही जप्ती किंवा वसुली बाकी नसून गुन्ह्याचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपीला पुढील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. गिरम यांनी डॉ. राजेंद्र खेडेकर यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अमेय बलकवडे, ॲड. वैभव हाटकर, ॲड. सुहेल बढे, ॲड. सायली मांडेकर, ॲड. ओंकार चव्हाण, ॲड. मंगेश सोन्नर, ॲड. ओंकार जगताप, ॲड. पूजा सिंघ, ॲड. प्रदीप माने, ॲड. आदित्य खोपडे, ॲड. विक्रम कोंडगुळी आणि ॲड. मयूर टकले यांनी कामकाज पाहिले.
दरम्यान, जामीन मंजूर झाल्यामुळे खेडेकर यांना न्यायालयीन कोठडीतून सुटकेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यांच्यावरील आरोपांबाबतची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे.






