Pune : पुण्यातील घरबाजारात गेल्या काही वर्षांत मोठे बदल दिसून येत आहेत. विशेषतः मध्यवर्ती भागात घर घेण्याकडे नागरिकांचा कल लक्षणीय वाढला आहे. कुशमन अँड वेकफिल्ड यांच्या चौथ्या तिमाहीतील ‘रेसिडेन्शिअल मार्केटबिट’ अहवालानुसार, 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत पुण्यातील प्रीमियम गृहनिर्माण बाजार स्थिर राहिला. एकूण घरविक्रीत किंचित मंदी असली, तरी उच्चभ्रू आणि लक्झरी घरांची मागणी मजबूत राहिली आहे. वर्षभरात घरांच्या किमतींमध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ नोंदली गेली.

ही वाढ केवळ मागणीमुळे नाही, तर शहरातील बदलत्या पायाभूत सुविधांमुळेही आहे. पुणे मेट्रोचा विस्तार, सुधारलेली महामार्ग कनेक्टिव्हिटी, तसेच शहरातील रस्ते आणि नागरी सुविधांमध्ये झालेली गुंतवणूक यामुळे मध्य पुण्याचे आकर्षण वाढले आहे. एनआरआय गुंतवणूकदारांचा सातत्याने राहिलेला कल आणि स्थानिक खरेदीदारांची वाढती आर्थिक क्षमता यामुळेही बाजाराला बळ मिळाले.
संगमवाडी, बंडगार्डन रोड, केनेडी रोड आणि मंगळवार पेठ हे भाग सध्या सर्वाधिक मागणीत आहेत. ऐतिहासिक वारसा, जुन्या बाजारपेठा, मंदिरे आणि सांस्कृतिक वातावरण यामुळे या परिसराला वेगळी ओळख आहे. त्याचवेळी कोरेगाव पार्क, कल्याणीनगर आणि शिवाजीनगरसारख्या व्यावसायिक केंद्रांशी सुलभ संपर्क असल्याने कामकाज आणि राहणी यांचा समतोल साधता येतो. रेल्वे स्थानक आणि लोहगाव विमानतळाशी जवळीक हा आणखी एक मोठा फायदा आहे.
मध्यवर्ती भागातून मगरपट्टा सिटी, येरवडा आणि खराडीतील आयटी पार्कपर्यंत सहज पोहोचता येत असल्याने आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी हा परिसर सोयीचा ठरतो. नियोजनबद्ध रस्ते, हिरवळ, नामांकित शाळा, रुग्णालये आणि मनोरंजन सुविधा यामुळे कुटुंबीयांचाही कल वाढतो आहे. परिणामी, आधुनिक सुविधा, स्मार्ट होम तंत्रज्ञान आणि शाश्वत जीवनशैलीवर आधारित प्रीमियम प्रकल्प येथे उभे राहत आहेत.
गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहता, मध्य पुण्यातील मजबूत भाडे मागणी आणि सातत्याने वाढणाऱ्या मालमत्ता किमती भविष्यात चांगला परतावा देऊ शकतात. मात्र, वाढत्या किमतींचा विचार करून खरेदीपूर्वी पायाभूत सुविधा, प्रकल्पाची विश्वसनीयता आणि दीर्घकालीन विकास आराखडा तपासणे आवश्यक आहे. पुण्याचा विस्तार जरी सुरू असला, तरी ‘कनेक्टिव्हिटी आणि जीवनमान’ या दोन घटकांमुळे मध्य पुणे पुन्हा एकदा घरबाजाराच्या केंद्रस्थानी आले आहे.





