Pune Crime: लोणीकंद, ता. 2 : कॉलेजच्या आर्थिक व्यवहारांबाबत जाब विचारण्याचे धाडस केल्यामुळे 65 वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्यावर सख्ख्या भावाने आणि पुतण्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणीकंद (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सगुणा बिल्डिंग येथे 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंदचे आदर्श सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर रामचंद्र भुमकर आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शंकर भुमकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लोणीकंद परिसरात खळबळ उडाली असून शिक्षण संस्थेतील आर्थिक व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

उद्धव रामचंद्र भुमकर (वय 65, रा. लोणीकंद) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुमकर कुटुंबाच्या मालकीच्या बकोरी रोडवरील शिक्षण संस्थेत श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत श्रीरामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व डिप्लोमा कॉलेज चालवले जाते. या दोन्ही संस्थांचा कारभार उद्धव रामचंद्र भुमकर आणि त्यांचे भाऊ शंकर भुमकर पाहत असले तरी आर्थिक व्यवहार शंकर भुमकर व त्यांचा मुलगा सिद्धांत भुमकर हे हाताळत होते.
कॉलेजमधील सीसीटीव्हीचा पासवर्ड बदलणे आणि महत्त्वाच्या फाइल्स गायब झाल्याबाबत फिर्यादी उद्धव भुमकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी सगुणा बिल्डिंग येथे जाऊन शंकर भुमकर व सिद्धांत भुमकर यांना विचारणा केली. त्यावेळी “तू आम्हाला विचारणारा कोण?” अशी दमदाटी करत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर दोघांनी मिळून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच कठीण वस्तूने छाती व पाठीवर मारहाण केली. या वेळी पांडुरंग भुमकर, त्यांची पत्नी स्वाती भुमकर आणि लक्ष्मी भुमकर यांनी मध्यस्थी करत मारहाण थांबवली.
या मारहाणीत उद्धव भुमकर यांच्या नाक, तोंड, डोळे व शरीरावर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शंकर रामचंद्र भुमकर (वय 58) आणि सिद्धांत शंकर भुमकर (वय 25, रा. लोणीकंद) यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 118 (1), 115 (2), 352 आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.






