Pune : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्तीला तडा देणाऱ्यांविरोधात भारतीय जनता पक्षाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणारे किंवा विरोधी उमेदवारांना मदत केल्याचा आरोप असलेल्या तब्बल ६९ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी ही घोषणा करत “पक्षविरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत,” असा स्पष्ट इशारा दिला.

यामध्ये कोथरूडमधील अमोल बालवडकर यांच्यासह विविध मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक कारवाई हडपसर मतदारसंघात झाली असून तेथील १९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंटमधील प्रत्येकी ९, वडगावशेरीतील ८, शिवाजीनगरमधील ७, कोथरूड व कसबा पेठेतील प्रत्येकी ६ आणि पर्वतीतील ४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमागे उमेदवारी वाटपातील नाराजी हा मुख्य मुद्दा असल्याचे दिसते. पुण्यात भाजपच्या तिकिटासाठी सुमारे अडीच हजार इच्छुकांनी अर्ज केले होते. मात्र, जागावाटपाचे समीकरण, मित्रपक्षांसोबतची तडजोड आणि अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या काही नेत्यांना दिलेले प्राधान्य यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. या असंतोषातून काहींनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तर काहींनी अधिकृत उमेदवारांविरोधात प्रचार केला.
राजकीयदृष्ट्या ही कारवाई महत्त्वाची मानली जाते. निवडणुकीत अंतर्गत बंडाळीमुळे मतविभाजन होऊन पक्षाला फटका बसू शकतो. त्यामुळे संघटनशक्ती टिकवण्यासाठी आणि भविष्यातील निवडणुकांसाठी कडक संदेश देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेष म्हणजे, निलंबितांपैकी काहींनी आधीच पक्षाशी संबंध तोडल्याची चर्चा आहे.
पुण्यातील राजकारणात ही घडामोड आगामी काळात नवे समीकरण घडवू शकते. नाराज गट स्वतंत्र राजकीय भूमिका घेतो की पुन्हा मुख्य प्रवाहात येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







