पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून रिक्षातून फिरणाऱ्या एका टोळीने अक्षरशः उच्छाद मांडला होता. कोयत्याचा धाक दाखवून वाटेत भेटणाऱ्या प्रवाशांचे अपहरण करायचे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळायचे, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. दरम्यान, याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अत्यंत धाडसाने सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

नाशिक फाटा येथून 15 मार्च रोजी नितीन महाजन नावाच्या प्रवाशाला रिक्षात बसवून, कोयत्याचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करण्यात आले. हा थरार संपत नाही तोच, अवघ्या 24 तासांत म्हणजेच 16 मार्चला सूरज शेलार या दुसऱ्या व्यक्तीचेही अपहरण करत खंडणी वसूल केली. या घटनांमुळे भोसरी आणि सांगवी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. भररस्त्यातून लोकांचे अपहरण होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, गुन्हेगारांचे लोकेशन भोसरी एमआयडीसी परिसर दाखवत होते. पोलिसांनी तातडीने परिसराला घेराव घातला. पोलिसांना पाहताच आरोपी पवन छगन उजगरे (वय 26 ) आणि सुमित हनुमंत कराड (वय 28) या गुन्हेगारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिस याप्रकरणी सध्या अधिक तपास करत आहे.







