पिंपरी-चिंचवड: आपल्या पाल्याने आकाशाला गवसणी घालावी, मोठ्या हुद्द्यावर जाऊन नाव कमवावे, हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. पुण्यातील चहोली परिसरातील बिरनारायण सिंग यांचेही असेच स्वप्न होते. (Pimpri-Chinchwad) मुलीला पायलट म्हणून पाहण्याचे. मात्र, याच स्वप्नाचा गैरफायदा घेत एका महाठगाने या कुटुंबाला तब्बल 5 लाख 45 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.

कर्नाटक येथील शरणगौड नावाच्या एका व्यक्तीने सांगितले कि, “कर्नाटकच्या एका नामांकित कॉलेजमध्ये तुमच्या मुलीला पायलट कोर्ससाठी प्रवेश मिळवून देतो,” या महागड्या कोर्ससाठी 50 लाखांचे बजेट असल्याचे सांगून, त्याने ‘प्रोसेसिंग फी’ आणि ‘ऍडमिशन बुकिंग’च्या नावाखाली सिंग यांच्याकडून साडेपाच लाख रुपये उकळले.
सिंग यांनी पै-पै जमा करून ही रक्कम आरोपीला दिली. मात्र, पैसे घेऊनही प्रवेश मिळत नव्हता. आरोपी सतत नवनवीन कारणे सांगून टाळाटाळ करत होता. 2024 पासून 2026 उजाडले, तरी मुलीला प्रवेश मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बिरनारायण सिंग यांनी 24 फेब्रुवारीला दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता या ‘एजंट’विरुद्ध गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरू आहे.







