पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) पिंपळे गुरव परिसरात एका तरुणाला माणुसकी दाखवणे चांगलेच अंगाशी आले आहे. दुसऱ्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या २० वर्षांच्या तनिष्क गायकवाडवर दोन तरुणांनी दगडाने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ओमकार कॉलनी भागात घडली. एका डिलिव्हरी बॉयला काही जण विनाकारण मारत असल्याचे पाहून तनिष्क तिथे मध्यस्थी करायला गेला होता, मात्र आरोपींनी त्यालाच लक्ष्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तनिष्क हा मोरया पार्कचा रहिवासी असून तो तिथून जात असताना त्याला मारहाण सुरू असल्याचे दिसले. त्याने माणुसकीच्या नात्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, पण मारहाण करणाऱ्या गुंडांना त्याचा राग आला. त्यांनी तनिष्कचा पाठलाग करून त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून भररस्त्यात अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
सांगवी पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत कार्तिक चव्हाण (वय १९) आणि चिराग घाट (वय २०) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. जखमी तनिष्कने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पुणे आणि परिसरात सध्या किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटना वाढत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







