पिंपरी-चिंचवड: वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला संत मदर तेरेसा उड्डाणपूल आणि चिंचवड-थेरगावचा बटरफ्लाय ब्रिज (Pimpri-Chinchwad) पूर्ण झाला आहे. मात्र, नागरिकांना या पुलांचा वापर करता यावा यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा जोड रस्ता अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा फेरा मारावा (Traffic Congestion) लागत असून, यामुळे वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे.

चिंचवडगाव स्मशानभूमीजवळील केशवनगर भागातून बटरफ्लाय ब्रिजपर्यंत जाणारा सुमारे 2.5 किलोमीटर लांबीचा आणि 18 मीटर रुंद असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून भूसंपादन प्रक्रियेमुळे रखडला आहे. या रस्त्याचा मोठा भाग निळ्या पूररेषेत येत असल्याने जागा मालकांना महापालिकेकडून कमी मोबदला मिळतो आहे. यामुळे जागा मालक भूसंपादनाला विरोध करत आहेत.
हा रस्ता पूर्ण झाल्यास चिंचवडगाव, थेरगाव, काळेवाडी फाटा, चिखली, वाकड, रहाटणी यांसारख्या परिसरातील नागरिकांचा प्रवास सोयीचा होईल. सध्या हा रस्ता अपूर्ण असल्याने वाहनचालकांना 5 ते 7 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. या समस्येवर अद्याप कोणताही ठोस तोडगा काढला गेला नाही, ज्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता समाविष्ट असूनही काम रखडल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. ‘उड्डाणपूल तयार, पण रस्ता कधी?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. स्थानिक नागरिकांनी हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाचा योग्य वापर होऊ शकेल.








