विशाल शिंदे

राजगड : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड तालुक्याची अवस्था आजही बिकटच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ घालवलेल्या या भूमीला ना रस्ते नीट मिळाले, ना आरोग्य, ना शिक्षणाच्या चांगल्या सुविधा. हे चित्र बदलावे म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष अभिषेक वैराट यांनी राजगडच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनानेच पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे.
राजगड तालुक्यातील वेल्हे परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांना आजही शाळा, दवाखाना किंवा इतर मूलभूत सोयींसाठी जीव धोक्यात घालून जावे लागते. रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा अपुरी, शिक्षण व्यवस्था तोकडी यामुळे लोकांचे दैनंदिन जीवन हालाखीचे झाले आहे.
अभिषेक वैराट म्हणाले, “देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली, पण आमचा तालुका मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. पुढारी आणि नेते त्यांच्या वर्चस्वाच्या राजकारणात मग्न आहेत. त्यांना लोकांच्या समस्या सोडवायला वेळ नाही. त्यामुळे प्रशासनानेच या समस्यांकडे लक्ष द्यावे.”
पुणे प्राईमने यासंदर्भात बातमी दिल्यानंतर प्रशासनही जागे झाले असून वैराट यांनी स्वतः प्रांताधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदन दिले. निवेदनात त्यांनी तहसील आणि प्रांत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दौरे करून गावोगावी पाहणी करावी, समस्यांचे प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठवून त्यावर पाठपुरावा करावा, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
“आपण प्रशासनाचा दुवा आहात. म्हणूनच आम्ही आपणाकडे अपेक्षा ठेवतो. लोकांचे हाल संपवण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घ्यावा,” असेही निवेदनात नमूद केले आहे.







