Nashik : नाशिकमध्ये एका दिवसात घडलेल्या दोन वेगवेगळ्या, पण तितक्याच धक्कादायक घटनांनी शहर हादरून गेले आहे. एकीकडे कौटुंबिक वादातून भावाने भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे, तर दुसरीकडे वडिलांच्या निधनाचा मानसिक आघात सहन न होऊन २१ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. (Nashik)
मावशीला हॉस्पिटलला नेण्यावरून भावाभावांत रक्तरंजित वाद
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास सद्भावना पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ही घटना घडली. संदीप विजय गायकवाड (वय ३३) आणि त्याचा लहान भाऊ अरविंद विजय गायकवाड (वय ३०) यांच्यात मावशीला हॉस्पिटलला कोण घेऊन जाणार, यावरून वाद झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला वाद काही क्षणांतच हाणामारीत बदलला.

रागाच्या भरात अरविंदने घरातील किचनमधील चाकू उचलून संदीपवर दोन वेळा वार केले. गंभीर जखमी अवस्थेत संदीप कोसळला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अरविंद गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोघांचे वडील नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असल्याने या घटनेने पोलीस वर्तुळातही खळबळ उडाली आहे. एका घरातल्या छोट्याशा वादाने थेट जीव घेण्यापर्यंत मजल मारल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
वडिलांच्या निधनाचा धक्का; २१ वर्षीय तरुणाचा विहिरीत मृत्यू
दरम्यान, नाशिकमधील सिडको परिसरात आणखी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. २१ वर्षीय शुभम बाळासाहेब व्यापारी याचा मृतदेह हांडे मळा येथील एका विहिरीत तरंगताना आढळून आला. काही दिवसांपूर्वीच शुभमच्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. कुटुंबाचा कणा तुटल्याने शुभम प्रचंड नैराश्यात होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.
वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांतच शुभम घरातून बेपत्ता झाला होता. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नव्हता. अखेर १९ जानेवारी रोजी विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्राथमिक तपासात मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दोन्ही घटनांनी कौटुंबिक तणाव, मानसिक आरोग्य आणि संवादाचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







