बारामती : खासगी संवर्गातील चारचाकी वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार असून, आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या खासगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल, त्यांनी ७ मे रोजी सकाळी १०.३० ते दु.३ वाजेपर्यंत धनाकर्षासह (डी.डी.) विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी ७ मे रोजी सायं ५ वा. कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल.
यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डी.डी. जमा करावयाचा असेल. त्यांनी ८ मे रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४.३० वा. संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा धनाकर्ष भरलेल्या व्यक्तीस नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, छायाचित्र, ओळखपत्र व पॅनकार्डची स्वाक्षांकित प्रत व ‘डीवाय.आर.टी.ओ., बारामती’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा बारामती येथील धनाकर्ष असावा. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही.

नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी सांगितले







