Loni kalbhor : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील यात्रेला गेलेल्या तरुणांवर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता. 25) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या मारहाणीत कमरेच्या बेल्टच्या लोखंडी हुकने थेट डोक्यात मार लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रविण राजुभाऊ घोडके (वय 21, मगरवस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गौरव खलसे, आदेश बरडे (रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) व एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण घोडके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण घोडके व त्याचे मित्र ऋषिकेश लोंढे, अमर लोंढे व इतरांसह कुंजीरवाडी येथील यात्रा पाहण्यासाठी 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गेले होते. ते सर्वजण रात्री 9 वाजता बाजार मैदान परिसरात घरी जाण्यासाठी थांबले असताना, अमर लोंढे याच्यासोबत पूर्वी भांडण झालेले गौरव खलसे, आदेश बरडे व त्यांचे इतर दोन साथीदार समोर उभे होते.
फिर्यादी प्रविण घोडके यांनी “काय पाहता?” अशी विचारणा करताच आरोपींनी शिवीगाळ सुरू केली आणि संतापाच्या भरात गौरव खलसे याने कमरेचा बेल्ट काढून त्यातील लोखंडी हुक प्रविण घोडके यांच्या डोक्यात मारला. या प्रहारात प्रविण घोडके जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी तिघांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने हस्तक्षेप करून सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर प्रविण घोडके यांनी आरोपींच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार गौरव खलसे, आदेश बरडे व अनोळखी इसमाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 115(1), 118(1), 131, 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







