लोणी काळभोर: हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी एकास अटक करून सुमारे सव्वा 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोळपेवस्ती परिसरातील कॅनॉलजवळ असलेल्या एरीगेशनच्या जागेमध्ये सोमवारी (ता.17) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

संदीप बादशहा राजपुत (रा. वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे) व बनफुल बादशहा राजपुत (रा. कोळपेवस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपी बनफुल राजपुत याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार बाजीराव वीर यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार बाजीराव वीर हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना रामदरा रस्त्यावरील कोळपे वस्तीच्या जवळ कॅनॉलच्या कडेला असलेल्या एरीगेशनच्या जागेतील झाडांच्या झुडपामध्ये हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी तातडीने छापा टाकला. तेव्हा संदीप राजपुत व बनफुल राजपुत हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारु तयार करीत असताना आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी या छाप्यात आरोपी बनफुल राजपुत याला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा हातभट्टी दारु तयार करण्याचे रसायन व दारु विक्रीचे साधन, दुचाकी जप्त केली आहे.

सदर ची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील नागलोत, बाजीराव वीर, पोलिस अंमलदार योगेश पाटील, शैलेश कुदळे, मंगेश नानापुरे, संदीप धुमाळ, दत्तात्रय तेलंग यांनी केली.
अवैध धंद्यावरील या कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील सर्व अवैध धंदे व अनाधिकृत कृत्यांना चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी कारवाया करुन अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे उद्दिष्ट आहे.
– राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)







