पुणे: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local Bodies Election) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे संघटनात्मक (Pune Election) पाऊल उचलले आहे. पक्षाकडून बुधवारी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये पुणे जिल्ह्याची जबाबदारी केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे. यामुळे आता पुणे जिल्ह्यातील भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीचे नेतृत्व मोहोळ यांच्या हाती राहणार आहे.

पुणे शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षाने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. बिडकर हे अनुभवी नेते असून त्यांनी महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते म्हणून काम केले आहे. ते दोन वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. बिडकर यांच्याकडे आता शहरातील निवडणुकीचे सर्व नियोजन आणि प्रचाराची सूत्रे असतील.
पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत पुणे जिल्ह्यातील विविध मतदारसंघांसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पुणे उत्तर (मावळ) मतदारसंघाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पुणे दक्षिण (बारामती) मतदारसंघाची जबाबदारी आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहराची जबाबदारी माजी आमदार शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा होताच भाजपने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची नेमणूक करून पक्षाने आपले नियोजन आखले आहे. पुणे जिल्ह्याची कमान खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हातात देण्यात आल्याने स्थानिक पातळीवरील निवडणुकीत पक्ष अधिक आक्रमकपणे उतरू शकतो, असे मानले जात आहे. मोहोळ यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा फायदा पुणे भाजपला होईल, अशी पक्षातील अपेक्षा आहे. या नियुक्त्यांमुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून, महायुतीकडूनही आता रणनीती अधिक स्पष्ट होताना दिसत आहे.







