पानशेत: कुरण खुर्द (पानशेत) येथील मंगेश विठ्ठल ठाकर व महेश विठ्ठल ठाकर यांच्या घराच्या दारात सकाळी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश केला आणि दारात बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला करून त्याचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्याभरात ठाकर कुटुंबाचे एकूण तीन कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडले आहेत. या घटनेची माहिती ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासन व वनविभागाला देण्यात आली असून, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी आले होते. मात्र, वनविभागाने तक्रार नोंद घेण्यास नकार देत नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला, अशी ग्रामस्थांची कैफियत आहे.
पानशेत व वरसगाव धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे हा भाग निर्मनुष्य नसताना देखील वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतो आहे. गावकऱ्यांनी बिबट्याचा पिंजरा लावण्याची वारंवार मागणी केली असली तरी वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
“गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरे शेतात चारण्यासाठी नेणे शक्य होत नाही, घराबाहेर पडताना देखील जीव मुठीत धरावा लागतो,” वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी मनुष्यहानी होण्याआधीच शासन व वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.






