पुणे : पुण्यात दिवसेंदिवस चोरी, फ्रॉड तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. हा एक गंभीर मुद्दा बनत चालला असून, नुकतीच एक बातमी समोर आली आहे. आंबेगाव परिसरात एका व्यवसायिकाला मारहाण करून ४० लाख रुपयांची बॅग चोरून नेल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अभिजित विष्णु पवार (वय ३२, रा. रामलिंगनगर, येडशी, ता जि. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित पवार हे पुण्यात एका कामासाठी ४० लाख रुपये घेऊन आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र मंगेश ढोणे हाही होता. दोघेही बाबजी पेट्रोल पंपासमोरील इमारतीमध्ये त्यांच्या व्यावसायिक कामासाठी आले होते. त्यांनी त्यांची गाडी बाजूला लावली. गाडीतून पैशांची बॅग घेतली आणि खाली उतरले व इमारतीकडे जाऊ लागले. यावेळी चोरटयांनी मंगेश ढोणे याच्या खांद्यावरील पैशांनी भरलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. अभिजित पवार यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन पैशांची बॅग घेऊन तिथून पळून गेले. या प्रकरणी पोलिसांनी आता तपास सुरु केला असून, घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.







