Crime : शहरात घरफोडी करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि उत्तर प्रदेशात गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या दोन आरोपींना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 62 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे दोन्ही आरोपी आंतरराज्यीय ‘सनी’ गँगचे सदस्य आहेत, ज्यांच्यावर उत्तर प्रदेशात खून, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी आकाश सुभाष (23, मूळ रहिवासी मेरठ, उत्तर प्रदेश; सध्या सुंदरनगरी, दिल्ली) आणि जितेंद्र चतुर्वेदी (32, सुंदरनगरी, दिल्ली) हे परराज्यात घरफोडी करण्यासाठी विमान किंवा रेल्वेचा प्रवास करत होते. जानेवारीत विश्रामबाग पोलिस ठाण्यात घरफोडीची तक्रार नोंद झाली होती. फर्यादी घरात नसताना अज्ञात आरोपींनी दरवाजा तोडून घरफोडी केली होती.
पोलीस तपासादरम्यान आरोपी पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये थांबलेले असल्याचे समोर आले. महिनाभराच्या गुप्त तपासानंतर पोलीसांनी सापळा रचून आरोपी ओंकारेश्वर मंदिराजवळ ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. चोरी केलेले दागिने लॉजमध्ये लपवले होते; पोलिसांनी लॉजवर छापा टाकून 32 तोळे सोने आणि 125 ग्रॅम चांदी हस्तगत केली.
आरोपी आकाश सुभाष हा उत्तर प्रदेशातील ‘सनी गँग’शी संबंधित असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासात दोन्ही आरोपींनी पुण्यात विश्रामबाग, समर्थ, खडक आणि भोसरी पोलिस ठाणे हद्दीत पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







