Bhor : पुणे जिल्ह्यातील कुरुंगवडी येथे शनिवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. शेतात धान्य मळणीचे काम सुरू असताना मशिनमध्ये स्कार्फ आणि केस अडकल्यामुळे ४१ वर्षीय शुभांगी नीलेश राऊत यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा प्रकार त्यांच्या वाढदिवशीच घडला, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?
कुरुंगवडी हे गाव नसरापूर–राजगड मार्गावर वसलेले आहे. शनिवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या शेतात मसूर आणि वाटाणा मळण्याचे काम सुरू होते. शेतातील मळणीयंत्र (थ्रेशर) सुरू असताना शुभांगी राऊत कामाची पाहणी करत होत्या. त्यावेळी त्या मशिनजवळ वाकल्या असताना त्यांच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ आणि मोकळे केस फिरत्या पट्ट्यात अडकले.
मशिनची गती प्रचंड असल्याने काही क्षणांतच त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी आणि शेतमजुरांनी तातडीने मशिन बंद करून त्यांना बाहेर काढले व नसरापूर येथील रुग्णालयात हलवले. मात्र, डोक्याला आणि मानेवर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.







