पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC Bank) लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

शुक्रवारी अल्पबचत भवन येथे झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 108 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत असताना अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली. या भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, ‘भरती करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.’

या भरती अंतर्गतलिपिक (लेखनिक), शिपाई, आणि वाहनचालक अशा विविध पदांसाठी एकूण 1 हजार 80 जागा भरल्या जाणार आहेत.

पुढे बोलताना अजितदादा म्हणाले, “बँकेत एकूण 1,080 जागांची भरती होणार असून, यातील पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक जागांची भरती केली जाईल. तसेच येत्या काही दिवसांत आणखी पावणेचारशे जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही भरती सहकार खाते, नाबार्ड (NABARD) आणि रिझर्व्ह बँकेने (RBI) ठरवून दिलेल्या नियमांनुसारच होणार असून, सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय दिला जाईल.” असे स्पष्ट केले आहे.
पुढे त्यांनी या भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर भर देत बँक संचालक मंडळाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार किंवा गडबड झाल्यास, ते सहन केले जाणार नाही. एका जिल्हा बँकेच्या भरतीत झालेल्या गैरप्रकाराचा संदर्भ देत ते म्हणाले, “यावेळी भरतीचा दर पंचवीस लाख रुपये ठरल्याच्या तक्रारी आल्या होत्या. असे प्रकार झाल्यास सर्वसामान्य घरातील नागरिक भरडले जातात. भरतीत काही गडबड झाल्याचे माझ्या कानावर आले, तर कोणालाही माफ करणार नाही.” असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
यावेळी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना नियमांपेक्षा माणुसकीला महत्त्व देण्याची सूचनाही केली. सगळ्या गोष्टी नियमांवर बोट ठेवून करू नका. शेवटी माणसे, बळीराजा जगला पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.







