पुणे: एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Ajit Pawar) निवडणुकांची तयारी (Jay Pawar) जोरात सुरू आहे. प्रचाराचा मोठा धुरळा उडाला आहे. उपमुख्यमंत्री (Yugendra Pawar) अजित पवार राज्यभर विविध नगरपालिका क्षेत्रांत जाऊन प्रचार करत आहेत. परंतु या सगळ्या राजकीय गडबडीत पवार कुटुंबात सध्या लग्नसराईचा माहोल आहे. पवार कुटुंबात एकाच वेळी दोन विवाह सोहळे होत असल्याने कुटुंबीय या तयारीत व्यस्त आहेत.

अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचे लग्न 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडणार असून, त्यासाठी ते सध्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसत आहे. युगेंद्र पवार यांनी काही काळापासून निवडणूक प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती, मात्र आता ते लग्नाच्या तयारीत लक्ष केंद्रित करत आहेत.
तर दुसरीकडे जय पवारदेखील विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह सोहळा 5 डिसेंबर रोजी होईल. जय पवार यांचे लग्न परदेशात होणार असल्याची माहिती आहे. जय पवार नेहमी निवडणुकांच्या काळात मैदानात सक्रिय दिसतात, परंतु या वेळी लग्नाच्या तयारीमुळे ते प्रचारात दिसत नाहीत. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवारदेखील यावेळी प्रचारात सक्रिय दिसत नाहीत.
अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. एका बाजूला घरात लगीनघाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला निवडणूक प्रचारात उपस्थित राहणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे ते दोन्ही जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना दिसत आहेत.
दरम्यान, राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. वरिष्ठ नेते, पक्षांचे प्रचारक मैदानात उतरले आहेत. अजित पवार प्रचारसभांमध्ये निधीवाटप आणि विकासकामांचा उल्लेख करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांची सक्रियता या निवडणुकीत कमी असल्याचे दिसत आहे.







