पुणे: जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पुणे विभागात चेन ओढल्याच्या १ हजार ७५७ घटना घडल्या आहेत. यामध्ये १ हजार ४४२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नऊ लाख दंड वसूल केला आहे. परंतु, या वाढत्या चेन पुलिंगच्या घटना रोखण्यात आरपीएफ अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे प्रवासात दुर्घटना घडल्यावर किंवा काही अडचणीच्या वेळी प्रवाशांना साखळी (चेन) ओढून रेल्वे थांबविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रवाशांकडून विनाकारण साखळी ओढली जात असल्याचे प्रकार वारंवार घडत आहे.

चेन पुलिंगच्या घटना पुणे स्थानकावर जास्त प्रमाणात घडत आहे. त्यानंतर पुणे-लोणावळा आणि पुणे-कोल्हापूर लोहमार्गावर चेन पुलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे गाड्यांच्या नियोजित वेळेवरदेखील परिणाम होत आहे. त्याचा फटका इतर गाड्यांना बसत आहे. पुणे विभागातून जवळपास दोनशे रेल्वे गाड्या दररोज धावतात. यामधून सव्वालाख नागरिक प्रवास करतात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रेल्वे गाडी थांबविण्यासाठी चेन पुलिंगची सोय आहे.
चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफकडून रात्रीच्या वेळी दोन-दोन पोलिसांच्या मदतीने पेट्रोलिंग करण्यात येते. रात्री साडेबारा ते दोन आणि पहाटे साडेतीन ते पाच या दोन टप्यांत हे पेट्रोलिंग केले जात आहे. तरीही चेन पुलिंग करणाऱ्यांवर कोणताही फरक पडलेला दिसत नाही. वर्षभरात घटना कमी होण्याऐवजी ते वाढत आहे. यामुळे आरपीएफच्या कामावर प्रश्नचिन्ह केली जात आहे. रेल्वे गाडीत आग लागल्यास, प्रवाशांची प्रकृती खालावल्यास, दरोडा पडल्यास चेन ओढले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत चेन पुलिंगच्या घटनांत खूपच वाढ झाली आहे. एखादा सहकारी किंवा नातेवाईक खाली राहिला, बॅग विसरली, अशा किरकोळ कारणांवरून साखळी ओढून रेल्वे थांबविण्याचे प्रकार होत आहेत. काही महाभाग तर गंमत म्हणून साखळी ओढत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या नियोजनावर परिणाम होत आहे.








