Accident News : सातारा : कराड आणि मलकापूर परिसरात बुधवारी रात्री घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिलेचा मृत्यू झाला, तर एका 13 वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापिका सुषमा आनंदा कीर्तने या सायंकाळी कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून बसस्थानकाकडे जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत त्या दुचाकीसह काही अंतर फरफटत गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या कॉलेजमधील अनुभवी प्राध्यापिका होत्या आणि नुकतीच त्यांनी पीएचडी पूर्ण केली होती.
दुसरी घटना मलकापूर येथे घडली. येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर ती थेट भाजी मंडईत घुसली. या अपघातात एका भाजी विक्रेती महिलेचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.







