
पुणे: पुणे महानगरपालिकेने शहरातील तलावांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार कात्रज येथील प्राणीसंग्रहालयाजवळील तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या कामासाठी जवळपास ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे आणि पावसाळ्यापूर्वीच झालेल्या गोंधळामुळे काढलेला गाळ पुन्हा तलावातच गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

महापालिकेच्या जलसंपदा विभागाकडून दोन जेसीबी व चार डंपरच्या सहाय्याने जवळपास १०,००० क्युबिक मीटर गाळ तलावातून काढण्यात आला होता. मात्र, गाळ अन्यत्र हलवण्याऐवजी तो तलावाच्या कडेला कृत्रिम बेट उभारण्यासाठी ठेवण्यात आला. पावसाच्या आगमनामुळे या गाळाचा मोठा भाग पुन्हा तलावात वाहून गेला, ज्यामुळे गाळ काढण्याचे संपूर्ण प्रयत्न वाया गेले.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, कात्रज तलावलगत बेट तयार करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही. जर तलावातील गळातून कृत्रिम बेट तयार करायचे होते तर आरसीसी फाउंडेशन अथवा दगडी पीचिंगचा भराव टाकणे गरजेचे होते. मात्र, अद्याप त्यावरील आराखडा मंजूर झालेला नव्हता. त्यामुळे गाळ काठावरच ढिगावस्थेत राहिला. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारची निष्काळजीपणाची योजना करणे म्हणजे पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी आहे.
या कामासाठी ठेकेदाराला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. तरीदेखील गाळ उचलून हलवण्याचे काम झाले नाही. स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या या बेजबाबदार कारभारावर नाराजी व्यक्त केली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, कात्रज तलाव हा आंबिल ओढ्याचा स्रोत आहे. त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याला पूर येण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.







