Laxman Hake On Supriya Sule: ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी खासदार (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे बारामती आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पवार कुटुंबातील जमीन व्यवहारांची चर्चा अद्याप सुरू असतानाच हाके यांनी बारामती तालुक्यातील 100 एकर वतनी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

नेमका हाकेंचा आरोप काय ?
बारामती तालुक्यातील गोजुबावी गावात 100 एकर वतनी जमीन असून त्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अधिकार मिळवण्याची हालचाल चालू असल्याचे त्यांना माहिती मिळाली आहे. हा प्रयत्न सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही जमीन गावातील स्थानिक कुटुंबांची वतनी मालमत्ता असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत बळकावू देणार नाही, असेही ते म्हणाले. लवकरच गोजुबावी येथे जाऊन ते सत्याग्रह आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
अलीकडेच पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी प्रकरणामुळे पवार कुटुंब चर्चेत होते. पुणे जिल्ह्यात त्यांच्या कंपनीने वतनी जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. प्रकरण गाजताच करार रद्द करण्यात आला आणि चौकशी सुरू झाली. या प्रकरणाची हवा अद्याप सुरू असताना आता सुप्रिया सुळे यांच्यावर नवीन आरोप झाल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.
हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही कठोर शब्दांत लक्ष्य केले. राज्यात यापूर्वी मालमत्तेशी संबंधित वादांतून अनेक नेत्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे देत अजित पवारांनीही स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर झालेले आरोप तपासून घेण्यासाठी पद सोडावे, अशी मागणी त्यांनी केली. पार्थ पवार यांच्या वादग्रस्त व्यवहारांवर अजित पवार किती काळ पांघरूण घालतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लवकरच पार्थ पवारांविरोधात उपोषण आणि धरणे आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला. हाके यांच्या गंभीर आरोपांमुळे बारामती राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणावर संबंधितांकडून कोणती भूमिका समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







